II ॐ गण गणपतये नमः II

 दि. २८/०२/२०२४….

आज संकष्टी, लहान – मोठ्यांच्या आवडत्या देवाची गणपती बाप्पाची पूजा,उपवास,दर्शन,मोदक आणि बरेच काही…

सर्व जगभर वेगवेगळ्या अवतारात, नावांमध्ये ह्या देवाची पूजा होते गणाधिपती गणपती…

हो तर हे सगळे लिहावेसे वाटले कारण आज दुपारी संकष्टी निमित्त  मराठी चित्रपट “अष्टविनायक ” लागला होता कुठल्या तरी मराठी चॅनल वर, ह्या चित्रपटाची कथा, त्यातले गाजलेले आणि प्रत्येक गणपतीला सगळ्या घरांमध्ये लागणारे “अष्टविनायका तुझा महिमा कसा ” हे गाणे.

ह्या चित्रपटाची कथा तशी खूपच साधी आहे,पण चित्रपट बघताना असेच वाटत राहते की हे सगळे आपले आयुष्यच आपल्यापुढे चलचित्र बनून डोळ्यांपुढे दिसतेय. मी हा चित्रपट खूप वेळा पाहिलाय,आणि प्रत्येकवेळी डोळे कधी गळू लागतात कळतच नाही, गाणे ऐकताना तर अगदी ऊर भरून येतो,आणि डोळ्यातून अश्रू वाहून गेल्यावर एकदम हलके वाटते, मनाची मरगळ ,भीती निघून गेलेली असते,सगळे सोपे सोपे वाटायला लागते.

( चित्रपटाची कथा,पात्र,कलाकार ह्याबद्दल काहीच सांगणार नाही,हो मुद्दामून च नाही सांगणार,कारण हा चित्रपट बघून अनुभवण्यासाठी आहे, सांगून ह्यातले भाव कळणार नाहीत,म्हणून तो अवश्य बघा आणि सांगा मी जे अनुभवले ते तसेच तुम्हाला वाटले की नाही..ते)..

आयुष्यात असे काही क्षण किवा परिस्थिती येते की तेव्हा सगळे संपले असे वाटते, आणि त्याच वेळेस एखादी दैवी शक्ती आपल्याला त्या संकटातून तारून नेते, बाहेर काढते, अगदी सहजपणे,जणू काही ते संकट कधी नव्हतेच..

तुम्हाला असे काही होते का? नक्की सांगा….

आशुतोष दंडगव्हाळ….

“गीत रामायण”

दि.२७/०१/२०२४.

II श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे,रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमःll
सद्ध्या सगळीकडे अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिराचिच चर्चा चालू आहे, समस्त हिंदूचे हृदयस्थ असलेल्या श्री रामाचे भव्यदिव्य असे मंदिर अयोध्येत उभे राहिलेले ह्याची डोळा ह्याची देही आपण पहात आहोत, २२ जानेवारी चा हा मंगलमय दिवस आपण कधीच विसरू शकणार,आपली पिढी भाग्यवान आहे की हे सगळे आपल्या डोळ्यादेखत होतेय. सगळे वातावरण राममय झालेय. सगळीकडे रामरक्षा,रामाची भजने म्हटली जातायेत. महाराष्ट्रात साधारण सगळ्या घरात निदान एकदा तरी गीत रामायण लागले असेल,तसे ते रोझाच लागते,पण ह्या वातावरणात सगळ्यांनी आठवणीने ते लावले असेल आणि ऐकले असेल.
तर आता तुम्हाला समजले असेल की ही वरील प्रस्तावना “गीत रामायण” साठी होती…दोन दिगज्जानी मिळून दिलेली ही अप्रतिम देणगी आपण कधीच विसरू शकणार नाही,विसरल्या जाणारही नाही.
गदिमा आणि बाबुजींनी दिलेला हा अप्रतिम ठेवा युगेन युगे आपल्या मनावर राज्य करत राहील आणि करतोयच कि, हो की नाही..
गदिमां नी संपूर्ण रामायण ५६ गाण्यांमध्ये श्रुखलेत आपल्या समोर ठेवले आणि ती गाणी इतकी सुंदर लिहिलीयेत आणि बाबूजींच्या आवाजात आणि संगीतात ती इतकी सुश्राव्य आणि भावपुर्ण झाली आहेत की श्रीरामाचे चरित्र तो काळ जसेच्या तसा आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो, गेली ८०-९० वर्षे हे गीत रामायण आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे, आपल्या मनावर राज्य करतय. अगदी थोरांपासून आजकालच्या मुला मुलींना ही ते तितकेच ऐकायला आवडते.
मला वाटते गदिमां नी हे महाकाव्य आपल्याला देऊन आपले आयुष्य समृद्ध केलंय, ज्याला मराठी भाषा शिकायची असेल त्याने हे महाकाव्य वाचावे त्याला दुसरे कुठले पुस्तक वाचायची गरज पडणार नाही, छंद,अलंकार, शब्द संग्रह, शब्दालंकार आणि अर्थालंकार इतके सुरेख वापरलियेत की त्याला तोड नाही.असे काव्य परत होणे नाही.
हे कमी होते की काय म्हणून बाबूजीं नी( श्री.सुधीर फडके) ह्या महाकाव्याला इतके सुरेख संगीत दिलंय आणि त्यांच्याच स्वर्गीय आवाजात आपल्या समोर ठेवले की असे वाटते देवाला आपण एक वर मागतो आणि देव आपल्याला दोन वर देतो. एकतर अजरामर असे काव्य गदिमांचे आणि त्याला संगीत व आवाज बाबूजीं चा, अजून काय हवे आपल्याला, मग हे महाकाव्य ऐकताना आपली अवस्था काय होत असेल हे प्रत्यक्ष अनुभवातून आपल्याला वेळोवेळी कळलेलेच आहे होय की नाही…

बाबुजींनी संगीत देताना संगीतातले सगळे राग वापरलेले आहेत,कुठल्याही नवशिक्या गायकाने,संगीतकाराने अभ्यासाला घ्यावे असे हे सगळे आहे, ती सगळी गाणी बाबूजींच्या आवाजात ऐकताना सगळे भाव मनात येऊन जातात, भक्तिरसात माणूस चिंब भिजून निघतो, ” प्रत्यक्ष्या हून प्रतिमा उत्कट” ऐकताना डोळे कधी भरून येतात काळात नाही… ही अवस्था माझी एकट्याची च होत असेल असे मला वाटत नाही,तुम्हीही ह्याच अवस्थे तून नक्कीच गेला असणार,हे नक्की…

तुमचा अनुभव ऐकायला नक्की आवडेल…

आशुतोष दंडगव्हाळ…

” नवरात्र व गरबा”

नुकतेच घट ,दसरा संपन्न झाला, नऊ दिवस नवरात्रीचे कसे गेले कळले नाही, त्यात सगळीकडे गरब्याची धूम होती, लॉक डाऊन नंतरचे मुक्त असे सेलिब्रेशन सगळ्यांनी साजरे केले. सगळीकडे नव चैतन्य – उत्साह  नुसता सळसळत होता.

गरबा दांडिया ची धूम सगळीकडे होती,कॉलेज ला असताना आमचा ग्रुप दांडियाची महिनाभरापासून तयारी करायचा, मुलींचे ड्रेस, दागिने ही तयारी तर मुलांची विविध दांडिया ग्रुप ची पासेस मिळवायची सेटिंग चालू असायची. एकदा चे पास हातात आले की हुश…

हे सगळे आठवायचे कारण ह्यावेळेस आमच्या घराजवळच दांडियाचे नियोजन केले गेले होते, रोज जाऊ जाऊ ठरऊन ही जाणे होत नव्हते,आज शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही सहपरिवार दांडियाला पोचलो,नेहमीचेच वातावरण,काहीही change झाले नव्हते,तीच मुला मुलींची गर्दी नातूनसाजून आलेली तरुणाई, आत मध्ये जायची गर्दी. सगळे पाहून परत जुने आमचे दिवस आठवले.

आतमध्ये गेलो, आरती झाली आणि दांडीया ला सुरुवात झाली, धुंद होऊन मुले मुली च नाहीतर अगदी ६० -७० वर्षाची मंडळी पण हौस भागऊन घेत होती. 

सहज सगळ्यांकडे लक्ष गेले, किती प्रकार होते त्यात,कोणी नुसतेच बघायला आले होते, कोणी त्यांच्या लहान मुला मुलींना नटून थटून आणले होते,ती छोटी छोटी बच्चे कंपनी मोठे काय नाचतील इतके छान ठेका धरून नाचत होती, सगळ्यांचे मोबाईल त्यांचे फोटो ,व्हिडिओ काढण्यात मग्न होती, तरुणाई तर वेगळ्याच जगात होती, कोणी जोडीदाराबरोबर मुग्ध होऊन दांडीया खेळत होती, काही नुकतेच सजून धजून फोटो काढण्यात मग्न होती. ह्या लोकांना फक्त फोटो काढण्यात माझा येत होती. काही प्रौढ कपल्स अगदी ठरऊन नऊ दिवस न चुकता वेगवेगळी वेशभूषा करून सुरुवातीपासून ते थेट बंद होईपर्यंत खेळत होती. त्यांना कोणी डिस्टर्ब केलेले अजिबात आवडत नव्हते. 

त्यात काही बायका – माणसे अगदी धुंद होऊन दांडीया खेळत होती, माझ्यामते त्या दांडियात मुग्ध होउन दांडीया खेळून त्यात अगदी दमून जाऊन त्यांच्या संसारातील सगळा त्रास, थकवा, रुसवा-फुगवा ,नाराजी,मनाविरुद्ध कराव्या लागणार adjustment, ऑफिस च्या कटकटी, खर्चाचा मेळ बसून बसून दमलेला तो – ती विसरण्याचा प्रयत्न करत असतील का? कुठे बोलता येत नाही तर दांडीया खेळून त्या देवीसमोर त्यांचे मन मोकळे करून घेत असतील का? 

ते काहीही असो, पण खरेच कधी कधी असे वाटते की आजकालच्या जगात जिथे मोकळेपणाने कोणा समोर व्यक्त होता येत नसताना अशी जागा जिथे त्या देवीसमोर तिचे नामस्मरण करून तिच्या नावाचा जागर करत स्वतःला मुग्ध, सैल सोडून सगळा मनातला गोंधळ,त्रास काढून टाकता यावा ह्यासारखे सुख ते काय. दांडीया खेळून सगळी दमत नसतील,तर सगळे मनातले निघून गेल्यावर मन शांत झाल्यावरचा तो गोड थकवा असावा.

आपल्याला नेहमी सांगितले जाते आपल्याकडील प्रत्येक प्रथेला काहिन काही वैद्यकीय आधार आहे, ते सगळे खरेच आहे ह्याचा प्रत्यय ह्या नऊ दिवसात सगळ्यांना येत असेल हो की नाही….

आशुतोष दंडगव्हाळ…

अगतिकता की हव्यास????

दि.१३/०९/२०२३.

अगतिकता की हव्यास??

परवा ऑफिस मिटिंग साठी मुंबई ला गेलो होतो, सकाळी हॉटेल वरून ऑफिस ला रिक्षाने निघालो,आमचा रिक्षा वाला निघाला यूपी चा भय्या, माझे सोबत अजून एक ऑफिस चा मित्र होता, शुद्ध आणि कुठलीही भेसळ नसलेली हिंदी बोलणारा श्यामभाई, आम्ही मार्केटिंग वाल्यांच्या सवयी प्रमाणे त्याचे आणि त्या रिक्षा वाल्याचे इकडचे तिकडचे बोलणे सुरू झाले, काय कुठले,कशासाठी आपले नेहमीचे प्रश्न आणि त्यांची नेहमीचीच उत्तरे. 

रिक्षा वाल्याला त्यातून कळले की आम्ही ऑफिस साठी मुंबईत आलोय, झाले ह्याच्यावरून त्या भय्या च्या मनाचा बांध फुटला आणि भडभडून बोलायला सुरुवात झाली, पहिलेच वाक्य ” साब अपना गाव छोडके क्यूँ आये इधर, थोडा कम पैसा मिलेगा तो भी चलेगा,मगर अपने गाव मे काम करो, मगर इधर नही”. यायला भैय्याचे वाक्य ऐकून डोकेच फिरले, हा गडी यूपी वरून इथे महाराष्ट्रात येऊन काम करतोय,आणि आम्ही एक दिवसा साठी इकडे आलोय तर गडी आम्हाला लेक्चर देतोय. 

आम्ही दोघेही एकदमच त्याच्यावर चढलो, ” क्या भैय्या,तुम इतना दूर से आके इधर काम कर रहे हो, और हमको बोल रहे हो ,इधर मत आना.” येवढे म्हणायचा अवकाश गडी एकदम भाऊक होऊन बोलायला लागला,”अरे हमको ही पता है, हम यहा कैसे रह रहे हैं, अरे बच्चो की याद आती है, मां – बाबुजी कि फिकर रहती है, घरवाली क्या और कैसे संभालती होगी सब,चिंता होती है,मगर कुछ नही कर सकते,साल के पहले किसी का मुंह दिखता नहीं है,कभी जाना भी होता है तो आणे जने का टाइम छोडके मुश्किल से २/३ दिन मिलते है, उसमे क्या देखेंगे,क्या मिलेंगे और क्या बात करेंगे बोलो.भैय्या इधर रहे तो उधर की चिंता, उधर रहे तो यहा की चिंता,अरे जिंदगी जी नहीं सकते,सिर्फ कमाओ और पेट पालो,२००३ से आया हुं इधर २३ साल हो गए साब,आजभी अटका पड़ा हुं,वापस जाने की अभी उम्मीद ही नहीं रही,ऐसा ये चक्रव्यूह में अटक गया हूं भैय्या,जिनके लिए कर रहा हूं वो दिखते नही,सिर्फ इतना है फैमिली को कूछ अच्छा मिल रहा है ये तस्सली बोलके रात में सब को याद करके सो जाता हूं,दूसरे दिन के लिए. इसलिए आपको बोला,कुछ गलत बोला तो माफ करना”.

येवढे बोलुन भय्या थांबला,आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो,काय बोलावे ते सुचत नव्हते, तेवढ्यात ऑफिस आले,आम्ही काहीतरी थातूरमातूर बोलून भैय्या ला सोडले,आणि ऑफिस मध्ये शिरलो,पण डोक्यातून भैय्या आणि त्याचे बोलणे काही जात नव्हते.

भैय्या खरेच बोलत होता की, आपण चार पैसे जास्त मिळावे म्हणून आपल्या लोकांना सोडून दूर कामाला येतो,पण त्या चार अधिकच्या पैशांसाठी मोलाचे काही गमवून तर नाही ना बसत? हा विचार व्हायला हवा खरा,ठीक आहे परिस्थितीने काही गोष्टी कराव्या लागतात,तिथे पर्याय नसतो,जसे कि तो रिक्षा वाला भय्या,पण सगळ्यांच्याच बाबतीत असे नसावे , नाही का? बरेचसे लोक फक्त पैसा जास्त मिळतो म्हणून दूर जातात, राहतातही,त्यांच्या मनात हे असे भैय्या सारखे विचार येत नसतील का कधी? त्यांच्या नाही तर त्यांच्या परिवारातील लोकांच्या तरी मनात असे विचार येत असतील का? वाटत असेल का त्या भैय्या ला की,परिवारातल्या कोणी सदस्याने म्हणावे,आम्ही थोडी जबाबदारी उचलतो किवां आहे त्यात आपण सुखाने राहू पण एकत्र राहू,वेगळे असे दूर नको,तुम्ही असे दूर जाऊ,राहू नका आम्हाला सोडून. 

खरंच अशी कित्येक लोक असतील जे असे कोणी त्यांना म्हणायची वाट बघत असतील की राहूदे नको आम्हाला काही पण तू परत ये आमच्या जवळ, किवा त्यांचा परिवारातील सदस्य असतील ज्यांना ओरडुन सांगावे वाटत असेल,की बस आता,नको तो तुमचा अधिकचा पैसा,पण तुम्ही आमच्या बरोबर रहा….

अगतिकता की हव्यास, त्याचा की परिवाराचा??? तुमच्या प्रतिक्रिया महत्वाच्या……

आशुतोष दंडगव्हाळ…